33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeराजकीयUddhav Thackeray : 'त्या' कंपन्यांना टाळे ठोका; प्रदूषण थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश

Uddhav Thackeray : ‘त्या’ कंपन्यांना टाळे ठोका; प्रदूषण थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश

टीम लय भारी

कोल्हापुर० : कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून मंगळवारी झालेल्या एका बैठकीत हे प्रदूषण थांबवण्यासाठी कठोर आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असलेली पंचगंगा नदी कंपन्यांमधून सोडल्या जाणऱ्या पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा व पंचगंगा नदीसाठी स्वतंत्र अधिकार असलेले प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शनिवारी झालेल्या बैठकीत केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर लगेच बैठक घेत, पंचगंगा नदीच्या प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोका आणि जोपर्यंत सर्व नियमांचे पालन होत नाही तोपर्यंत हे टाळे काढू नका, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.

गेल्या अनेक वर्षापासून पंचगंगा नदी प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी वर्षा निवासस्थानी मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला. बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

प्रदूषणाबाबत दर महिन्याला अहवाल देणार

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पंचगंगा नदी प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांचे पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवणार आहे व दर महिन्याला अहवाल देणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी चौथ्याच दिवशी घेतली बैठक

कोल्हापूर जिल्ह्याची पंचगंगा नदी ही हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे व नदीकिनारी असलेल्या गावातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे, असे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रश्नाबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौथ्याच दिवशी ही बैठक घेतली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी